एनएच ३६१ वर प्रवाशांची लूट
लातूर (निखिल माने): महिला शौचालयाला दरवाजाच बसवला नाही आणि राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली मात्र सुरू करण्याची घाई एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ने सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोलनाका संपला की लगेच डाव्या बाजूला एक प्रशस्थ शौचालय प्रवाशांसाठी बांधण्याची जबाबदारी हायवे बांधणाऱ्या कंत्राटदाराची असते. औसा ते तुळजापूर या नवीन बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर आशिव टोल प्लाझा आहे. इथे मात्र ठरवून दिलेल्या आकारा मधील शौचालय तर सोडाच परंतु अतिशय अस्वच्छ आणि केवळ दोनच रूमचे शौचालय प्रवाशांसाठी बांधण्यात आले आहे. या शौचालयाला दरवाजा सदरील कंत्राटदाराने बसवलेला नाही, तसेच पाणी आणि लाईटची सुध्दा सोय नाही. अशा बिना दरवाजाच्या शौचालयाचा वापर महिलांनी कसा करावा असा साधा प्रश्न सुद्धा या कंत्राटदाराच्या डोक्यात आला नाही. परंतु (एन एच ए आय)च्या पदाधिकाऱ्यांनी मात्र टोलवसुलीची परवानगी या कंत्राटदाराला दिलीच नाही तर फास्टटॅगच्या माध्यमातून तून अतिशय वेगाने सदरील टोल नाक्यावर टोल वसुली सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम जर पूर्ण झालेले नाही तर टोल वसूली करण्याची परवानगी नॅशनल हायवे अथोरिटीने कशी काय दिली हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दैनिक राजधर्मची टीम सदरील टोल नाक्यावर गेल्यानंतर तेथील काही कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केली. शौचालय कुठे आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी आम्हाला कंपनीच्या ऑफिसचा रस्ता दाखवला परंतु हे ऑफिस आणि तेथील टॉयलेट अतिशय अस्वच्छ तसेच आडबाजूला असल्यामुळे प्रवाशांना वापरणे कठीण आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांना धरून नाही. नियमानसार राष्ट्रीय महामार्गावर हे शौचालय असणे आवश्यक आहे. दुभाजका मध्ये झाडे लावण्याची जबाबदारी सुद्धा रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराची असते परंतु सर्व दुभाजकामध्ये केवळ वाढीव गाजर गवत उगवले आहे. एकही झाड लावलेले नाही. तुळजापूर पासून निघाल्यानंतर औस्या पर्यंत एकाही पूलावर पथ दिवे चालू नाहीत, नियमाने पथ दिवे चालू असणे बंधन कारक आहे. सर्व पूल अंधारातच आहेत. एवढे सगळे काम अपूर्ण असताना सुद्धा नागरिक आनंदाने टोल भरत आहेत याचे आश्चर्यच आहे.याबाबत एन एच ए आय नांदेड विभागाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता कोणीही उत्तर देण्यास तयार नाही. याचा अर्थ नक्कीच मोठ्या प्रमाणात अर्थ पूर्ण व्यवहार झाला असल्याचे टाळता येत नाही.