लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना प्रसिद्धीची भारी हौस


लातूर(प्रतिनिधी) लातूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे सदैव कोणत्या ना कोणत्या कारणासाठी माध्यमांमध्ये झळकत असतात. कालचे निमित्त होते पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाचे, लातूर शहरातील एका मतदान केंद्रावर जी श्रीकांत पाहणी करण्यासाठी गेले असता वृद्धांना ताटकळत ठेवण्यापेक्षा बसण्यासाठी शाळेतील बेंच देण्याचे त्यांनी सुचवले एवढेच नाही तर त्या बेंचेस वरची धूळ सुद्धा त्यांनी स्वतः स्वच्छ केली. फोटोमध्ये दिसते आहे की आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना बाक साफ करताना बघून कर्मचारी धावत आले "सर सर राहू द्या आम्ही करतो" परंतु आमचे कलेक्टर साहेब काही ऐकेनात त्यांनी घेतला कपडा आणि लागले साफ करायला एवढेच नाही तर आमच्या सरकारी यंत्रणेतील छायाचित्रकार त्यांच्या अशा मुद्रा टिपण्यामध्ये पारंगत आहेत. लगेच छायाचित्रकारांनी त्यांची ही छबी टिपली आणि रीतसर प्रसारमाध्यमांना ई-मेलही केली. जी श्रीकांत बाकावरची धूळ कशी स्वच्छ करायची हे कर्मचाऱ्यांना शिकवू इच्छित होते, की कर्मचारी त्यांचे काही ऐकत नाहीत यामुळे ते बाक स्वतः स्वच्छ करत होते हा प्रश्न मात्र उपस्थित होतो.


प्रकाश झोतात येण्यासाठी त्यांनी केलेले अनेक प्रकार यापूर्वीही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. अलीकडेच लॉकडाउन असताना लातूर शहरामध्ये हातात काठी घेऊन गाड्यांची तपासणी करतानाचा फोटो माध्यमांनी प्रसिद्ध केला होता. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यावेळी पोलिसांची भूमिका निभावताना दिसून आले. परंतु लातूर जिल्ह्यातील नागरिकांना एकच प्रश्न पडत होता की जर जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः हातात काठी घेऊन रस्त्यावर उभे रहावे लागत असेल तर याचा अर्थ आपली पोलिस यंत्रणा कमी पडते आहे का. सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी काम करून घेणे अपेक्षित असताना ते स्वतः अनेक कामे करताना दिसतात आणि हि कामे करतानाचे त्यांचे फोटो सुध्दा प्रसिध्द होतात. एक वेळ जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः काठी घेऊन रस्त्यावर उभे राहणे ठीक आहे परंतु या गोष्टीला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवून दिली जाते याचे आश्चर्य वाटते.


जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स तर लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. 'शंकरा शंकरा' गाण्यावर त्यांनी धरलेला ठेका लातूरकरांना अविस्मरणीय आहे. तसेच नवरात्र उत्सवामध्ये सायकलिंग करत तुळजापुरला गेलेले जी श्रीकांत जेव्हा संबळच्या तालावर ठेका धरतात त्याची बातच काही निराळी आहे. हा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला आहे. तसेच वर्तमानपत्रांनीही याची दखल घेतली. दैनिकांच्या वार्ताहारांशी जिल्हाधिकाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यामुळेच कदाचित ते या ना त्या कारणाने माध्यमांमधून प्रकाशझोतात राहण्यामध्ये यशस्वी होतात किंबहुना त्यांना प्रसिद्धीची आवडच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लातूर जिल्ह्यातील राजकारण्यांना सुध्दा अशा प्रकारची प्रसिध्दी मिळवता आलेली नाही.


Popular posts