महापारेषणमधील पारेषण वाहिन्यांची पाहणी व देखभालीची कामे आता ड्रोनव्दारे होणार

महापारेषणमधील पारेषण वाहिन्यांची पाहणी व देखभालीची कामे आता ड्रोनव्दारे होणार


------------------------------------------------------------------------------------------------


ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पाठपुराव्याला यश


------------------------------------------------------------------------------------------------


मुंबई, दि. १७ : महापारेषणच्या अति उच्च दाब वाहिन्यांची निगा राखण्याचे काम जसे ग्राऊंड पेट्रोलिंग, टॉवर टॉप पेट्रोलिंग, सर्व्हे आदी कामे ड्रोनव्दारे केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागामार्फत परवानगी घेऊन करण्याचा उपक्रम महापारेषणव्दारे घेण्यात आला. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा व मनुष्यबळाची बचत झाली आहे. वीज क्षेत्रात ड्रोनव्दारे काम करणारी महापारेषण मात्र देशातील एकमेव कंपनी ठरली आहे. यासंदर्भात केंद्र शासनाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महापारेषणच्या उपक्रमाची दखल घेतली आहे. तसेच महापारेषणच्या कामाचा गौरवही केला आहे. दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्राकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे महापारेषणला हा उपक्रम राबविता आला.


महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी आहे. राज्यात ६८१ इएचव्ही क्षमतेची उपकेंद्रे आहेत. ४८ हजार ३२१ सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या आहेत. १,२८,९९० एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता आहे. २५ हजार एमडब्ल्यू ऊर्जा हाताळणीची क्षमता असलेली पारेषण यंत्रणा आहे. विशेषतः दुर्गम भागातून जाणाऱ्या पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग चांगल्या रितीने होत आहे.


महापारेषणच्या पारेषण वाहिन्यांची देखभाल दुरूस्तीचे काम ड्रोनव्दारे करण्यात येत असल्यामुळे ही कामे चांगल्या पध्दतीने व जलद गतीने होण्यास मदत होत आहे. ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरा व थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास आणून त्यांची तात्काळ दुरूस्ती करणे शक्य होत आहे.


विशेषतः नवीन प्रकल्पात सर्व्हेक्षण करण्यासाठीही या ड्रोन कॅमेराचा उपयोग होणार आहे. टॉवरच्या अगदी जवळ जाऊन ड्रोनव्दारे तपासणी होत आहे. त्यामुळे हे डायग्नोस्टिक टूल ठरले आहे. तसेच कार्यालयात बसून ड्रोनची हालचाल पाहणेही शक्य झाले आहे. नियमानुसार ड्रोन उडविण्याची उंची ५० मीटरपर्यंत आहे.``


ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांच्यासह महापारेषणच्या सर्व चमूचे कौतुक केले आहे.