लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

  • 15 जानेवारीला मतदान, 21 जानेवारीला निकाल
  • सोशल मीडियावर प्रशासन ठेवणार करडी नजर

 लातूर (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. 15 डिसेंबर रोजी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध होणार असून नामनिर्देशन मागविणे व सादर करण्याचे काम दिनांक 25 ते 27 डिसेंबरची सार्वजनिक सुटी वगळता 23 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 31 डिसेंबर रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 रोजी मागे घेता येतील तसेच याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी करून 21 जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

लातूर जिल्ह्यात एकूण 785 ग्रामपंचायती असून त्यापैकी 408 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 यादरम्यान संपणार आहे निवडून द्यावयाच्या एकूण उमेदवारांची संख्या 3548 एवढी आहे.

सर्व संभाव्य उमेदवारांनी संगणक प्रणालीद्वारेचं नामनिर्देशन पत्र व घोषणापत्र भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे  http://Panchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये स्वतःची नोंदणी करून घ्यावी व नामनिर्देशनपत्रे तसेच घोषणापत्रामध्ये माहिती भरणे आवश्यक आहे. (सदरील माहिती जतन करून ठेवता येऊ शकते) आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्याचे प्रिंटआउट काढून त्यावर स्वाक्षरी करून ते निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे विहित पद्धतीने दाखल करावयाची आहे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्जच नामनिर्देशनपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. सर्व ग्रामपंचायती मधील संग्राम केंद्र, महाऑनलाईन केंद्रे, तसेच सेतू सुविधा केंद्र येथे उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरता यावे यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. समाज माध्यमांवर चुकीचा संदेश पसरवू नका, तसेच समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर करा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. समाज माध्यमांचा चुकीचा वापर करणार्‍यांवर पुराव्यानिशी कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

पृथ्वीराज बी पी यांची पहिली पत्रकार परिषद


लातूरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पृथ्वीराज बीपी यांची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. यावेळी त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला जिल्हाधिकारी हे मूळ राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील असून गुजरात मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी कॉग्निझंट नावाच्या आयटी कंपनीमध्ये काही वर्ष नोकरी केल्यानंतर युपीएससीची परीक्षा देऊन भारतीय रेल्वे मध्ये 2011 रोजी आयआरटीएस पदावर काम केले आणि 2014 रोजी ते आयएएस झाले. त्यांची पहिली नियुक्ती सोलापूर येथे होती. यानंतर त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून भंडारा येथे काम केले आहे. तसेच 2018 साली त्यांनी परभणी जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले आहे. आता ते लातूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले आहेत. परभणी येथे कार्यरत असताना त्यांनी पाणी, शिक्षण आणि आरोग्य या समस्यांवर काम केले होते. लातूर मध्ये सुद्धा त्यांनी या तीन विषयांना महत्त्व देणार असल्याचे यावेळी सांगितले. विविध शासकीय विभागांमधील समन्वय योग्यरीत्या साधून उत्तम कामगिरी कशी करावी यावरही त्यांचा भर असेल असे यावेळी त्यांनी नमूद केले. या आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच आपला मोबाईल क्रमांक त्यांनी सर्वांना देऊन नागरिकांना आपल्या समस्या व्हाट्सअप वर पाठवण्याचे आवाहन केले.