गतिरोधकांमुळे अपघात झाला तर मनपा जबाबदार


  


» निविदेतील चुकांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात


» खडबडीत रस्त्यांमुळे वाहनांचा वेग आधीच कमी


» एकाही गतिरोधका समोर ना रिफ्लेक्टर ना सूचनाफलक


» गतिरोधक बसवताना पालिकेने पाळला नाही कोणताही नियम


» एकाच ठिकाणी दोन गतिरोधक बसवल्याने महिला दुचाकी चालकांना त्रास


लातूर, (निखिल माने): शहरात अलीकडेच बसवण्यात आलेले गतिरोधक नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. खडबडीत रस्त्यांमुळे वाहनांचा वेग आधीच कमी असल्यामुळे गतिरोधकांची गरज नसताना सुद्धा शहरातील अनेक भागांमध्ये लातर शहर महानगरपालिकेने गतिरोधक बसवले आहेत. हे गतिरोधक बसवताना कोणतीही 'स्पीड टेस्ट' करण्यात आली नाही. रात्रीच्या वेळी या गतिरोधकांवर रेडियम किंवा रिफ्लेक्टर नसल्यामळे दिसण्यास अडथळा होत आहे. गतिरोधक बसवताना कोणत्याही नियमाचे पालन पालिकेकडून करण्यात आले नाही. शिवाजी चौकातील भयारी मार्गावर दोन्ही बाजूंनी सुरुवातीला चार ठिकाणी दोन-दोन गतिरोधक बसविण्यात आले आणि नंतर ते काढूनही टाकण्यात आले. हे गतिरोधक बसवताना किंवा काढन टाकताना कोणत्या नियमाने कारवाई केली असे पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांना याचे उत्तर देता आले नाही. आले पालिकेच्या मना तेथे कोणाचेही चालेना अशी अवस्था झाली आहे. ज्या ठिकाणी २ गतिरोधक बसवण्यात आले आहेत तेथे महिला दचाकी चालकांना गाडीचा तोल सांभाळणे 'बॅलन्स' करणे कठीण जात आहे. भारतीय रोड काँग्रेसने सुचवल्याप्रमाणे गतिरोधक ओलांडताना वाहनाचा वेग २५ किलोमीटर प्रतितास असला पाहिजे परंतु शहरात बसवण्यात आलेले गतिरोधक ओलांडताना दुचाकीचालकांना जमिनीवर पाय टेकवावे लागत आहेत. हे गतिरोधक गती कमी करण्याचे काम करत नसून गाडी पूर्णतः थांबवण्याचे काम करत आहेत. अति वेगामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी बसवण्यात आलेले गतिरोधक अवैध पद्धतीने बसवले असता अती वेगाने होणाऱ्या अपघातान एवढेच नुकसान करू शकतात. या गतिरोधकांमुळे लातूर शहरातील रुग्णवाहिका, पोलीसांच्या गाड्या आणि अग्निशामक गाड्या इत्यादी अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांचा वेग सुद्धा मंदावला आहे. या गतिरोधकांमुळे शहरातील गाड्यांचे एव्हरेज कमी होऊन प्रदुषणात वाढ झाली आहे. तसेच गाड्यांमध्ये बिघाड होण्याची संख्या वाढली आहे. प्रत्येक गतिरोधकाच्या आजूबाजूला गाड्यांचे भाग गळून पडलेले दिसत आहेत. एकाच ठिकाणी असलेल्या दोन गतिरोधकांवरून जाताना रुग्णांवर, गर्भवती स्त्रियांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर विपरित परिणाम होत आहेत. या गतिरोधकांमुळे लातूरमधील ध्वनी प्रदूषणात भर पडली आहे. अचानक लावलेले ब्रेक, हॉर्न, गाड्यांचे विविध भागांचे आवाज, वाहतूक कोंडीचा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणामध्ये भर पडत आहे. भारतीय रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वानुसार गतिरोधक खालील प्रमाणे केवळ छोट्या रस्त्यांवरचबसवण्यात यावेत. गतिरोधकांचा वापर केवळ या तीन जागी ग्राह्य धरला जाऊ शकतो. १. ग्रामीण महामार्गासह किरकोळ रस्त्यांचा छेद जिथे तुलनात्मक दृष्ट्या कमी रहदारी असते. छोट्या रस्त्यावर परंतु जेथे सरासरी गाड्यांचा वेग जास्त असतो आणि रस्ता दिसण्यास कठीण असतो, अशा ठिकाणी अपघातांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अशा छोट्या रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याची शिफारस करण्यात येते. २. जेथे छोटे रस्ते मोठ्या रस्त्यांना मिळतात. ३. स्थानिक शहरी रस्ते जिथे निवासी भाग आहे. शाळा महाविद्यालय आणि दवाखाने आहेत. तसेच अशा भागांमध्ये जेथे रहदारी किमान मर्यादेपेक्षा जास्त वेगाने आहे. एकाच रस्त्यावर दोन ठिकाणी गतिरोधक बसवताना दोन्हीमधील किमान अंतर १०० ते १२० मीटर असवे लागते. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही लातूर शहर महानगरपालीकेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रेमकुमार घंटे ज्यांच्यावर शहरात गतिरोधक बसवण्याची जवाबदारी होती यांची भेट घेवून चर्चा केली असता, त्यांनी शहरात बसवण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहनचालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होतो आहे असे आम्हाला वाटत नाही असे सांगितले. गतिरोधकबसवताना कोणत्या नियमानुसार किंवा कायद्यानूसार आपण ते बसवले असे विचारले असता याचे उत्तर अभियंता घंटे यांना देता आले नाही. शिवाजी चौकातील गतिरोधक कोणत्या नियमाने बसवले व कोणत्या नियमाने काढले याचे उत्तरही घंटे यांना देता आले नाही. केवळ रस्ता सुरक्षा समितीची मान्यता घेतल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. रस्ता सुरक्षा समितीमधे एस पी, जिल्हाधिकारी, आर टी ओ, ट्राफीक पी आय, मनपा आयुक्त यांचा समावेश असतो. नियमानुसार गतिरोधक ओलांडताना गाड्यांचा वेग किती असणे अपेक्षित आहे? घंटे यांनी १० ते २० असे उत्तर दिले परंतु सध्यस्थितीत दुचाकीचालकांना जमिनीवर पाय टेकवावे लागत आहेत. गाड्यांचा वेग आधीच कमी असेल तेथे गतिरोधक बसवण्याची गरज नाही याची कबूली त्यांनी यावेळी दिली परंतु अंमलबजावणी मात्र केलेली दिसत नाही. मनपाने बसवलेले गतिरोधक आदर्श गतिरोधक नसल्याचे त्यांनी कबूल केले. गतिरोधकाच्या निविदेमध्ये रेडीयम किंवा रिफ्लेक्टरचा अंतर्भाव नसल्यामुळे ते बसवले नसल्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले. रिफ्लेक्टर आणि चेतावणी फलक नसल्यामुळे रात्री गतिरोध दिसत नाहीत यामुळे अपघात होवू शकतात. मनपाने बसवलेल्या गतिरोधकामुळे अपघात झाला तर मनपालाच जवाबदार धरण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.